info@rajevikramsinhghatgefoundation.com

फाऊंडेशनबद्दल

फाऊंडेशनबद्दल

लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपत स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण जीवन कागल, गडहिंग्लज व उत्तूरवासियांसाठी समर्पित केले. आपल्या प्रत्येक सहकारी संस्थेला शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांनी नवा आदर्श जपला. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे कार्य पुढे नेण्याच्या हेतूने लोकहिताची कामे करणे व त्यातून समाजहित जपणे हा एकमेव उद्देश घेऊन ९ ऑगस्ट २०१७ रोजी राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती व वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करत आहे.

पाणी व आरोग्य या मानवी जीवनातील मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक गावात पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने फाऊंडेशनतर्फे जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या अन्य योजना राबविल्या जात आहेत. निरोगी व सशक्त समाज हा विकासाचा पाया आहे. यासाठी सर्व समाजघटकांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. याच विचाराने विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य केंद्रे चालविली जात आहेत.

विविध समाज घटकांशी समरस होऊन त्यांच्या गरजा समजून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम फाऊंडेशनद्वारे केले जाते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गृहिणींना सिलेंडर वाटप, शेतकरी बांधवांना अवजारांचे वाटप, हाय वे वरील सुरक्षेसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या गाडयांना रिफ्लेक्टर लावण्याचे काम या व यासारख्या अनेक कामांची यशस्वी परिपूर्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून नियमितपणे होत आहे.

समाजोपयोगी कार्यांसह फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. तरुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ लाभावे या उद्देशाने फाऊंडेशनतर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सिंधुताई सपकाळ, तानाजी मालुसरेंचे वंशज यांसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची व्याख्याने सर्वांनाच नवी उर्मी देणारी ठरतात. शिवजयंती, रामनवमी व अन्य उत्सव तसेच सणांच्या माध्यमातून थोर राष्ट्र पुरुषांच्या विचारांचा जागर सदैव करण्यात येतो. अशा विविध कार्यक्रमांच्या वेळी काढलेल्या मिरवणुकांमध्ये केले जाणारे जनप्रबोधन त्याचबरोबर आयोजित केले जाणारे पारंपरिक खेळ, लेझीम, युद्धकला असे अनेक उपक्रम फाऊंडेशनतर्फे राबविले जातात जे विशेषकरून तरुण वर्गासाठी प्रेरणादायी व आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारे ठरतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचे तसेच सामाजिक सलोखा वाढविण्याचे कार्य याद्वारे फाऊंडेशन करत आहे.

राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुण्यस्मरणार्थ, दिनांक 13 एप्रिल 2017 रोजी या फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र, शाहू ग्रुप व म्हाडा पुणे चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे या फाऊंडेशनचे अध्यक्षपद सांभाळत असून त्यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आहेत. समर्पित वृत्तीने काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने राजमाता जिजाऊ संस्था व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या रूपाने महिला व युवक सक्षमीकरणाची धुरा तितक्याच तोलामोलाने पेलली जात आहे.